औरंगाबाद: दुष्काळाने होरपळलेला मराठवाडा उष्णतेच्या तडाख्यात होरपळून निघाला आहे. या महिन्यात तब्बल वीस दिवस तापमानाचा पारा ४० अंशावर राहिला. तर गेले सलग आठ दिवस तापमान ४२ अंशाच्या घरात आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार मराठवाड्यात उष्णतेचा तडाखा १ जून पर्यंत असणार आहे. त्यामुळे परवापासून तापमान काहीसे कमी होईल असा अंदाज वर्तवण्यात येतो. दुष्काळाने होरपळलेला मराठवाडा मान्सूनच्या आगमनाची आस लावून आहे. मात्र यावर्षी ५-६ जून रोजी मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण किनारपट्टी व त्यानंतर तसेच मराठवाड्यात मान्सून दाखल होण्यास सात ते आठ दिवसांचा कालावधी लागेल. त्यामुळे जूनच्या दुसऱ्या आठवड्यानंतर मान्सून मराठवाड्यात दाखल होईल अशी शक्यता आहे. मान्सूनचा प्रवास लांबल्याने शेतकरी मात्र चिंता व्यक्त करीत आहेत. दरम्यान मान्सूनच्या आगमनाला आवश्यक पोषक वातावरण अद्याप निर्माण झालेले नाही. रोहिणी नक्षत्र लागून आठवडाभराचा कालावधी लोटला तरीही वादळ तसेच वाऱ्याचा पत्ताच नाही त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.